अपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासू भाजपमध्ये; बाळासाहेब थोरातांना धक्का

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासुबाई शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून शशिकला पवार या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निळवंडे गावातून शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. शशिकला पवार या किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई आहेत.

गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी सहकार्य केलंय. या पुढेही दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू, असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मात्र थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं शशिकला पवार यांनी स्पष्ट केलं.

निळवंडे गाव हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात येतं. यामुळे शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ३७ पैकी २५ ग्रामपंचायतीत थोरात गटाने सत्ता मिळवली आहे. तरी थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटलांनी जोर्वे, तळेगाव दिघे, घुलेवाडी या थोरातांच्या ग्रामपंचायती खेचून आणल्या आणि आता निळवंडे ग्रामपंचायतीतही विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना शह दिला आहे.