निवृत्ती महाराज इंदुरीकर

आजपर्यंत आपण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले ऐकलं आहे. मात्र, बीडच्या (Beed) कळसंबरमध्ये दिलेल्या तारखेला कीर्तनाला येऊ शकत नाही अशी माहिती दिल्याने, ग्रामस्थांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये (Neknoor Police Station) धाव घेतली आहे.

यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं की, ‘इंदुरीकर महाराजांनी आज आम्हाला कीर्तनाची तारीख दिली होती. त्यामुळे आम्ही गाव परिसरात रिक्षाच्या माध्यमातून आज कीर्तन आहे, असं आवाहन देखील केलं आहे. त्याचबरोबर कीर्तनाच्या तयारीसाठी ग्रामस्थांचे आतापर्यंत एक ते दीड लाख रुपये खर्च झाले असून ऐनवेळी आता इंदुरीकर महाराजांनी मी कीर्तनाला येऊ शकत नाही, असं सांगितलं. त्यामुळे महाराजांनी आमची फसवणूक केली आहे.

जर महाराज आमच्या गावात आज नाही आले तरी चालेल, मात्र महाराज जर आज दुसऱ्या इतर ठिकाणी कुठे कीर्तनाला गेले, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आम्ही पुढे येऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

दरम्यान इंदुरीकर महाराज हे आजारी आहेत आपला काहीतरी गैरसमज झालाय, हे फोनवर बोलल्यानंतर लक्षात आल्यानं, ग्रामस्थ हे आल्यापावली पोलीस ठाण्यामधून परत गेले. यामुळे अद्याप पर्यंत तरी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही.

अशी माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिली. दरम्यान या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.