‘आपल्याला मुलगी व्हावी’ असं जेव्हा आई वडिलांना वाटतं अभिनेत्याच्या मजेशीर पोस्टची सेलिब्रिटींकडून खिल्ली

काल १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. या दिवशी मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून आपल्या मुलांचे क्युट फोटो शेअर केलेले दिसले. संकर्षण कऱ्हाडेने तर आपल्या जुळ्या मुलांना कडेवर घेऊन एक छानसा फोटो शेअर केला. माझी तूझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर तर श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे आणि दिग्दर्शक अजय मयेकर यांनी गोट्यांचा खेळ खेळला.
काही सेलिब्रिटींनी चक्क स्वतःच्याच बालपणीचे खास फोटो शेअर कडून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात एका सेलिब्रिटीचा फोटो मात्र खूपच चर्चेत आला. आपल्या आईवडिलांना जेव्हा मुलगी व्हावी अशी ईच्छा असते मात्र मुलगा झाल्याने ते त्याच्याकडून या अपेक्षा पूर्ण करतात तेव्हा हा विचार पाहून हसू आवरत नाही.
असाच काहीसा प्रकार मराठी चित्रपट मालिका अभिनेता अमेय वाघ याच्याबाबत झालेला पाहायला मिळाला. मुलीच्या गेटअपमध्ये असलेला एक फोटो अमेयने बालदिनाच्या दिवशी शेअर केला. मात्र हा फोटो पाहून ही मुलगी कोण असावी? असा अनेकांना प्रश्न पडला. अमेयच्या पोस्टमधून याचा उलगडा झाला तेव्हा सेलिब्रिटींनीच नाही तर त्याच्या चाहत्यांनी देखील त्याला मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
अमेय या फोटोबद्दल सांगतो की, ‘ जेव्हा तुमच्या आईवडिलांना आपल्याला मुलगी व्हावी असं वाटत असतं पण मुलगा होतो! तेव्हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये अनेक वर्ष मुलगीच व्हावं लागतं! हॅप्पी चिल्डरन्स डे!’ . असे म्हणत तो आपल्याला लहानपणी मुलगी का बनावं लागतं याचे स्पष्टीकरण देतो.
मात्र फोटोतली ही मुलगी पाहून हा अमेय नसून ‘अमेया वाघीण आहे’, ‘फ्रॉक छान आहे ग, रे असो ..वाघीण छान दिसते’ अशा प्रतिक्रिया सेलिब्रिटींनी आणि त्याच्या चाहत्यांनी देऊन त्याची खिल्ली उडवत त्याच्या फोटोचं कैतुक देखील केलं आहे. अमेय वाघने मराठी चित्रपट मालिकेतून विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत.
त्याच्या विनोदी भूमिकांचे देखील नेहमीच कौतुक करण्यात येतं. सेंटर फ्रेश च्या जाहिरातीतून अमेय पहिल्यांदा टीव्हीवर झळकला होता. २००८ साली आईचा गोंधळ या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. फास्टर फेणे, मुरांबा, गर्लफ्रेंड, झोंबिवली, अनन्या अशा चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येत राहिला आहे.
३ इडियट्स या बॉलिवूड चित्रपटात चतुरच्या भूमिकेसाठी त्याने ऑडिशन दिली होती मात्र काही कारणास्तव त्याला ही भूमिका मिळाली नाही. नाटकांतून काम करत असताना २०१२ सालच्या अय्या या हिंदी चित्रपटातून त्याने बॉलिवूड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतली त्याची भूमिका खूपच गाजली होती.
विक्रम पटवर्धन यांच्या फ्रेम या आगामी चित्रपटातून अमेय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. यशाचा एकेक टप्पा पार करताना त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी महागडी गाडी खरेदी केली होती. “पुढचा प्रवास खडतर असेल… तर तो Mercedes ने करावा म्हणतो!” असे कॅप्शन देऊन त्याने ४० ते ४७ लाखांची मर्सिडीज खरेदी करून आश्चर्याचा धक्का दिला होता.